मनपा स्थायी समिती सभापती निवडणूक : सेना-भाजप पदाधिकाऱ्यांची महापौर दालनात बंद दाराआड चर्चा

Foto

औरंगाबाद: स्थानिक सत्तेचे केंद्र असलेल्या मनपतील अर्थपूर्ण समिती मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदा करिता  4 जून रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचे काम केले नसल्याने शिवसेनेचा गोटात नाराजी आहे. आज शनिवारी सभापती पदाकरिता अर्ज दाखल करायचे आहेत.दरम्यान बारा वाजेच्या सुमारास महापौर दालनात शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बंद दाराआड चर्चेला प्रारंभ झाला.   

 4 जून रोजी निवड प्रक्रिया पार पडणाऱ्या स्थायी समिती  सभापती पदाकरिता शुक्रवारी अर्ज वाटप करण्यात आले. यावेळी सेना-भाजप, एमआयएम  अपक्ष आघाडी आदींनी अर्ज नेले होते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले चंद्रकांत खैरे यांचे काही भाजप नगरसेवकांनी काम केले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळाली. त्यातच थोड्या फरकाने खैरे पराभूत झाल्याने शिवसेनेच्या गोटात सध्या खैरे यांचे काम न केलेल्या भाजप पदाधिकाऱ्याबाबत नाराजी असल्याचे समजते. याचा थेट परिणाम स्थायी समिती सभापती निवडणुकीत दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. युतीच्या करारानुसार सभापतीपद भाजपच्या वाट्याला असतानादेखील शिवसेनेने सभापती पदाकरिता अर्ज नेला आहे. त्यामुळे शिवसेना युती धर्म पाळेल काय ? याबाबत भाजपच्या गोटात सध्या चिंता आहे. भाजप कडून सध्या राजू शिंदे व पूनम बमणे यांची नावे चर्चेत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सेना-भाजप पदाधिकाऱ्यांची होणारी बंद दाराआड चर्चा महत्त्वपूर्ण मानली जाते. यात भाजप पदाधिकाऱ्याकडून शिवसेनेची मनधरणी करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे पदाधिकारी मातोश्रीच्या आदेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे समजते. 


बैठकीला दिग्गज नेत्यांची उपस्थिती
या बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर  विजय औताडे, शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सभागृहनेता विकास जैन, राजू वैद्य, गजानन बारवाल, बापू घडामोडे, राजू शिंदे,मकरंद कुलकर्णी,प्रमोद राठोड, आदींची उपस्थिती होती.